---Advertisement---
महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट परतली असून मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी 6 ते 8 मेदरम्यान ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत तापमान 36 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता असल्याने उष्ण व दमट हवामान नागरिकांची कोंडी करणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेचा त्रास अधिक जाणवणार आहे. वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवेल. सध्या पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि खालच्या स्तरावर उत्तर-ईशान्येकडील उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे. यासोबतच राज्यावर चक्रीय वातस्थिती तयार होण्याची शक्यता असल्याने उष्ण हवा अडकून राहून उकाडा वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी अरबी समुद्रात लवकरच चक्रीवादळीय प्रणाली तयार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही प्रणाली केरळ किनारपट्टीजवळ निर्माण होण्याचा अंदाज असून पुढील 48 ते 72 तासांत याबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे. मात्र, या संभाव्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात मोठे चढ-उतार दिसत आहेत. कधी पाऊस, कधी गारपीट तर कधी कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा स्थितीत नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचाव करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा येथेही तापमान 42 अंशांच्या पुढे गेले आहे. यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असून पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सुट्ट्यांचा हंगाम असूनही पर्यटनस्थळांवर शुकशुकाट दिसत आहे.
एकूणच, पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरणार असून उष्णतेसोबतच समुद्रातील घडामोडींवरही सर्वांचे लक्ष लागले आहे.









