पारोळा-भडगाव रस्त्यावरील टिटवी गावाजवळ असलेल्या अंजनी नदीवर असलेल्या अरुंद पुलाचे नवीन बांधकाम गेल्या दीड वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. काम गेल्या एक वर्षांपासून सुरू होते. पुलाचे काम पूर्ण झाले परंतु पुलाच्या दोन्हीही साइटचा रस्ता व पुलाच्या भिंती मात्र अजूनही अपूर्णच आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र पाच पांडव देवस्थान येथून अंजनी नदीचा उगम झाला आहे. याच नदीवर महिंदळे व टिटवी या गावाच्या मध्ये असलेल्या पारोळा भडगाव रस्त्यावर अंजनी नदीवर अरुंद पूल होता पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी येत होते. त्यामुळे येथे नवीन उंच पुलाचे काम मंजूर झाले, परंतु मागील वर्षी मे महिन्यात कामाला सुरुवात झाली, ती वर्षभर चालली, तरीही अजूनही काम अपूर्णच आहे.
पुलाच्या दोन्हीही बाजूला पुलाच्या कामासाठी खोदलेला रस्ता पुलाचे काम झाले तरीही ‘जैसे थे’च आहे. या रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुढे पावसाळा सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात येथून वाहन घेऊन जाने जिकिरीचे होणार आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
गेल्या वर्षी पावसाळ्यात या पुलाचे काम ठेकेदाराने सुरू केले. वाहनधारकांसाठी पर्यायी रस्ता बनविला होता, परंतु तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन महिने वाहतून बंद होती. आताही या पुलाच्या अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात रस्ता बंद होण्याची भीती वाहन झधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारास वेठीस धरून पावसाळ्यापूर्वी अपूर्ण काम पूर्ण करण्यास भाग पडावे व वाहनधारकांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी होत आहे.
अंजनी नदीवरील या पुलाचे काम मागील वर्षी मे महिन्यापासून सुरू आहे. ते यावर्षी फक्त पुलाचे काम झाले. साइटच्या मिती व दोन्हीही बाजूचे रस्त्याचे काँक्रिटीकरण अजूनही अपूर्ण आहे. वेळोवेळी तंबी देऊनही ठेकेदार मनमानी करीत आहे. त्यामुळे आता प्रशासनामार्फत त्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून काम पूर्ण करण्यात येईल.
अभिषेक सोनवणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पारोळा.