अमळनेर येथे झोका खेळताना गळफास लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

अमळनेर : येथील मुंदडा नगरातील पाण्याचा टाकीजवळ राहणारा वेदांत संदीप पाटील (वय 14) याचा 20 रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास झोका खेळत असताना गळफास लागल्याने मृत्यू झाला.

वेदांत हा दररोज त्याच्या खोलीत अभ्यास करण्यासाठी जात असे. आजही नियमितपणे अभ्यास करण्यासाठी तो वरच्या खोलीत गेला. त्याच्या खोलीत असलेला झोका खेळला मात्र त्यात त्याने झोका खेळताना झोक्याला पीळ पळून गोल-गोल फिरण्याच्या नादात त्याचा तोल गेल्याने त्याला गळफास लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. वेदांतच्या आईने आरोळी मारली असता त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याच्या खोलीत जावून पाहिले असता तो झोक्याला लटकलेला अवस्थेत दिसला. यामुळे त्याच्या आईने आरोळी मारल्यावर वेदांतचे वडील संदीप पाटील, आजी हे गेले असता वेदांतला अडकलेल्या झोक्यातून काढून ताबडतोब खासगी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी वेदांतला मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात रात्रीच शवविछेदन करण्यात आले. वेदांतवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. वेदांत आमच्यातून असा कसा अचानक निघून गेला असे म्हणत त्याची आई, वडील, आजी लहान भाऊ यांचा आक्रोश मनाला हेलावणारा होता. दरम्यान अमळनेर पोलीस ठाण्यात कैलास पाटील यांच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वेदांत याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.