अल्पसंख्यक नेमके कोण?… मुस्लीम..? की हिंदू…!

दंगलीच्या अचानक घडणाऱ्या घटनांचा विचार करता असा प्रश्न उपस्थित होत असतो की.. अत्पसंख्यक नेमके कोण? हिंदू…? की मुस्लीम…? गत काळातील काही घटनांचा आढावा घेता हा प्रश्न उपस्थित होणे यात गैर किंवा अवास्तव असे काहीही नाही.

घुसखोरी, चूक कुणाचीही असो हिंदूना दोष देणे.. त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांच्या नेमक्या प्रमुख सणांच्या काळात वाद निर्माण करणे हे प्रकार आता नित्याचेच झालेले आहेत. आता हेच बघा ना बांगलादेशातून घुसखोरीचे प्रकार नवीन आहेत काय? तर निश्चितच नाही. वर्षानुवर्षे हे प्रकार सुरू आहेत. तेथे बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यक आहेत… त्यांच्यावर हल्ल्यांचे प्रकार वाढतच आहेत. ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनल. बांगलादेशच्या एका अहवालानुसार केवळ गेल्या ५ ते २० ऑगस्टच्या दरम्यान बांगलादेशात हिंदूंवर २,०१९ हल्ले झाल्याची नोंद आहे. बंगाल प्रांतातून झालेली घुसखोरी तर प्रचंड आहे. ही दादागिरी केवळ याच प्रदेशात आहे काय? तर याचे उत्तर नकारात्मकच येईल. आता अगदी परवा परवाचे उदाहरणच घ्या ना… छोट्याशा पाळधीत की जेथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वास्तव्य आहे. तेथे घडलेला प्रकार धक्कादायकच म्हणावा लागेल. ज्या वाहनात गुलाबराव पाटील यांच्या सौभाग्यवती काही महिलांसह प्रवास करीत होत्या, ते त्यांचे वाहन ज्या रस्त्याने जात होते त्यास तेथून जाण्यास विरोध करण्यात आला. यावर जाब विचारला असताना या छोट्याशा गावात दंगल उसळली… मोठी जाळपोळ झाली. अगदी संचारबंदी लागू करण्यापर्यंतची वेळ आली. आगग्रस्तांचे लाखोंचे नुकसान झाले. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. किती बेदरकार ही मंडळी… हिमत तरी कशी होते?

यापूर्वीही पाळधीत वारकरी मंडळींवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. छोट्याशा गावात जर असे प्रकार  घडत असतील तर ते हिंदूंनी सहन करावे का? त्यास उत्तर दिले तर दोषी त्यांनाच ठरविले जाते. मागील वर्षी दोंडाईचा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी निघालेल्या  रॅलीवर अचानक दगडफेक झाली होती. बेसावध असलेले अनेक कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झाले. त्यानंतर धुळे येथे एका दिंडीवर असाच अचानक हल्ला झाला; हे प्रकार माज चढत्याचे द्योतक आहे.

देशात निवडणुकीत एकगठ्‌ठा मतांच्या लालसेने होणारे लांगुलचालन आणि वैचारिक क्षमतेचा, शिक्षणाचा अभाव याही बाबी अशा गोष्टींना कदाचित कारणीभूत असू शकतात. परवा चित्रपट अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरट्याने धुडगूस, धुमाकूळ घातला. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. सैफला चोरट्याने जखमी केले. या घटनेनंतर हरफन मौला  संजय राऊत व मुल्ला जितेंद्र आव्हाड यांसारखी मंडळी जागी झाली. याविषयी त्यांचे वक्तव्य निव्वळ हास्यास्पद होते. सैफ अली मुस्लीम असल्याने या विषयाला धार्मिक रंग या मंडळीनी दिला. नंतर तपासात काय समोर आले? तर हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याचे समोर आले. यातून आंतरराष्ट्रीय षड्यंत्राची बाबही समोर येत आहे अटक केलेल्या आरोपीचे अद्यापजाबजवाब घेण्यात आलेले नाहीत.

त्याच्या जवाबानंतर अनेक बाबी समोर येणार आहेत. ही ‘मुल्ला’ मंडळी आरोप करताना अकांडतांडव करीत जोरात बोलत होती पण आता समोर जे आले; त्यामुळे त्यांची बोलती बंद झालेली आहे. सर्वच गप्प बसलेले दिसतायं…. हिंदूंची बाजू घेणं म्हणजे जणू पापच… असा समज काही जण दृढ करू पाहत आहेत. पण दंगलीचे, ताणतणावाचे, शांतता सलोखा भंग करण्याचे प्रकार आणि समाजमन कलुषित करणारे असे एक ना अनेक प्रकार घडत असतात. त्यामुळेच या देशात अल्पसंख्यक कोण? असा प्रश्न आता पडू लागला आहे.

-चंद्रशेखर जोशी,
निवासी संपादक ( तरुण भारत )