जळगाव । महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर, मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतीक्षा होती, जी अखेरीस नागपूरमध्ये पूर्ण झाली. त्यामुळे आता खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला तीन मंत्रिपदे कायम राहिली असून, या मंत्र्यांना कोणते खाते मिळते, यापेक्षा त्यांच्या पैकी कोण पालकमंत्री होतो याचीच चर्चा आणि उत्सुकता जिल्ह्यात आहे.
नागपूरात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन व संजय सावकारे यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्यानंतर आता कधी खाते वाटप होणार ? यामध्ये कोणाला कोणते खाते मिळणार ? याची उत्सुकता लागली आहे. मात्र याचबरोबर तिघांपैकी कुणाच्या गळ्यात जळगावच्या पालकमंत्रिपदाची माळ पडते, याकडेही जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
तसेच यापूर्वीच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास, पर्यटन, पाणीपुरवठा, तसेच मदत व पुनर्वसन ही खाती जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांकडे होती. आता हीच खाती राहणार की बदलणार, याकडे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांमध्ये गिरीश महाजन ज्येष्ठ असून, त्यांनी यापूर्वी पालकमंत्रिपद भूषविले आहे तर, संजय सावकारे राष्ट्रवादीत असताना त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. काही काळासाठी त्यांनाही पालकमंत्रिपद मिळाले होते. शिंदेसेनेचे गुलाबराव पाटील यांची मंत्रिपदाची तिसरी टर्म असून, गेल्यावेळी तेच पालकमंत्री होते.
त्यामुळे यावेळीही पालकमंत्रिपद गुलाबराव पाटील यांनाच मिळावं, अशी प्रबळ भावना शिंदेंच्या शिवसेनेने व्यक्ती केली आहे. आता जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत महायुतीचे नेते एकत्रित काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.