Nandurbar News :नंदुरबारला उड्डाणपुलाचा घाट घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी करणार : विजय चौधरी

नंदुरबार : तळोदा रस्त्यावर उड्डाणपूल होणार आहे. तो नागरी वस्तीसह व्यावसायिक आस्थापनेच्या दृष्टिकोनातून अडचणीचा असून, त्यामुळे नागरिकांचा तीव विरोध होत असल्यामुळे उड्डाणपूल होणार नाही. मात्र, उड्डाणपुलाचा घाट घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी करणार असून, यासाठी मी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी उपस्थित होते. विजय चौधरी म्हणाले की, शहरातील नंदुरबार ते तळोदा मार्गावर सीबी पेट्रोलपंप ते मंदाकिनी हॉटेलदरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रस्तावित आहे. त्याची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, हा उड्डाणपूल ज्या भागातून प्रस्तावित केला आहे, तो भाग शहरातील नागरी वस्तीचा तसेच व्यावसायिक आस्थापनेच्या दृष्टिकोनातून अडचणीचा आहे. या उड्डाणपुलास शहरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. शहरी भागातून उड्डाणपुलाची मागणी नागरिकांनी केलेली नाही, तसेच तांत्रिकदृष्ट्या हा उड्डाणपूल एकतर्फी आहे. याशिवाय, अपघाताला निमंत्रण देणारा ठरेल.

या रस्त्यावर शाळा-महाविद्यालय, हॉटेल, रहिवासी वस्ती, मंदिरही आहे. उड्डाणपूल केल्यास नागरिकांना मोठी अडचण होईल. या उड्डाणपुलाचा कुठल्याही प्रकारे फायदा होणार नाही. नागरिकांनी केलेल्या या तक्रारीवरून आपण याबाबत मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करू. चुकीचे सर्वेक्षण करून उड्डाणपुलाची गरज नसताना तेथे उड्डाणपुलाचा घाट घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार असल्याचेही प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले.