नवी दिल्ली : ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. या संमेलनाच्या तयारीबाबत शरद पवारांनी मंगळवारी स्थानिक पाहणी केली. संमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण दिले असून पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा केली आहे. पवारांना विश्वास आहे की, पंतप्रधान मोदी संमेलनाला उपस्थित राहतील.
पवारांनी संमेलनाच्या आयोजनासाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. यामध्ये आसन क्षमता, निवास आणि जेवणाची व्यवस्था, पुस्तक प्रदर्शन स्थळ इत्यादींचा समावेश आहे. शरद पवार यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत सुद्धा सुचना दिल्या. संमेलन भव्यदिव्य होण्यासाठी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्र ही सलोख्याची आणि समन्वयाची भूमी आहे, आणि मराठी वाङ्मयाने या ओळखीला आकार दिला आहे. भारताचे वैचारिक प्रतिनिधित्व करण्यात महाराष्ट्राचा आणि मराठी साहित्याचा मोठा वाटा राहिला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या यांच्यासारख्या माणसांनी साहित्यात आणि देशाच्या जडणघडणीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. देशाच्या राजधानीत संमेलन होत असताना महाराष्ट्राच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करून मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठावर कसे नेता येईल’, यादृष्टीने प्रयत्न या संमेलनाच्या अनुषंगाने करणार असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.
संमेलनाच्या आयोजक संस्था सरहदचे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या निर्मीतीनंतर दिल्लीत प्रथमच संमेलन होत आहे. या पार्श्वभुमीवर संमेलन परिसराला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असे नाव देण्याचे ठरले आहे, ७० वर्षांपूर्वी दिल्लीतील संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी केले होते.
शरद पवार यांच्यासह संमेलन स्थळ पाहणीसाठी संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, अतुल बोकरीया, प्रदीप पाटील, लेशपाल जवळगे उपस्थित होते.