---Advertisement---
उत्तम काळे
भुसावळ येथे नगरपालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची गेल्या दोन-तीन महिन्यापासून जोरदार चर्चा आहे. आता दोन दिवसांपूर्वीच दिवाळीचे फटाके फुटले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे फटाके कधी फुटतात याकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे. नगरपालिका निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, कोणती निवडणूक अगोदर होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र शहरी उमेदवारांसोबत ग्रामीण उमेदवारांनीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरी भागात इच्छुक उमेदवार रस्त्यावर उतरले आहे, तर ग्रामीण भागातील उमेदवारही खेड्यापाड्यात जाऊन मतदारांच्या भेटी सोबत इच्छुक यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीचे पूर्ण वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा इच्छुकांना आहे. दरम्यान, शहरात भाजपचे पारडे जड असले तरी ते शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबत महायुती करतात का? याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काही प्रमाणात शांतता व समजूतीची भूमिका निभावून घेईल. मात्र शिवसेना शिंदे गट सन्मानजनक जागा दिल्यास महायुती करण्यास तयार आहे. अन्यथा एकला चलोच्या भूमिकेत) स्वबळावर निवडणूक लढण्यास तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
जि. प. निवडणुकीत साधना पवार यांच्याविरुद्ध कोण ?
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तालुक्यातून दोन गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे, तर कुन्हे (पानाचे) हा एकमेव गट मात्र सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या गटातून भाजपकडून सध्या तरी कु-हे (पानाचे) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार यांच्या पत्नी साधना पवार यांचे एकमेव नाव चर्चेत आहे. इतर पक्षांची अद्याप तयारी नसल्याचे दिसून येत आहे.
भुसावळ येथे पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून माजी आमदार संतोष चौधरी यांचे सुपुत्र तथा युवा नेतृत्व सचिन चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यामुळे माजी आमदार चौधरी नगरपालिका निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. युती-महायुती, महाआघाडी न झाल्यास नागरिकांचा कल भाजानंतर सध्या तरी शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडे नगराध्यक्ष पदासह आठ ते दहा इच्छुक नगरसेवकांची संख्या आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी न मिळाल्यास यातीलही बरेच उमेदवार शिंदे गटाकडे जाण्याच्या तयारीत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (अजित पवार गट) तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत आहेत. मात्र भाजपने त्यांना सन्मानजनक जागा देऊन भूमिका निभवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिवसेना (शिंदे गट) भाजपने सन्मानजनक जागा न दिल्यास तिसरी आघाडी तयार करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात व देशात सत्तेवर असलेल्या महायुतीतील पक्षच भाजपची डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुबळ्या शिवसेना (उबाठा) काय होणार ?
वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांच्या नेतृत्वात भुसावळ पालिकेची निवडणूक लढणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे नेतृत्व माजी आमदार संतोष चौधरी यांनाच करावे लागणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिवसेना गटाचे नेतृत्व दीपक धांडे यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेतृत्व जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गट हा केवळ कागदोपत्री नावापुरता आहे. नगरपालिका निवडणूक लढवून काही जागा निवडून आणण्याचे धाडस व नेतृत्व ज्या पक्षाकडे नसल्याचे दिसून येत आहे. मात्र ते आव आणत असले तरी या नगरपालिका निवडणुकीत त्यांचा दम दिसून येईल, एवढे मात्र निश्चित.
ना. सावकारे यांची मसुद्देगिरी पालिका निवडणुकीत दिसणार
गेल्या २० वर्षापासून भुसावळ तालुक्याचे नेतृत्व करणारे राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे हे आता राजकारणात चांगले मुरब्बी झाले आहे. अतिशय शांततेत व कोणत्याही वादग्रस्त विषयावर प्रतिक्रिया न देता निर्णय घेणारे नेते म्हणून ते केवळ जळगाव जिल्ह्यालाच नव्हे तर बुलढाणा व भंडारा जिल्ह्यातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे ते या दोन्ही पक्षांना कसे सांभाळून घेतात याकडेही नागरिकांचे लक्ष लागून आहे.
लेवा पाटीदार समाजाच्या निर्णयावर नगराध्यक्ष
नगराध्यक्ष पदासाठी राज्याचे वस्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री-भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी तथा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांचे नाव भाजपकडून आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना (दोन्ही गट) यांच्याकडून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या स्वाती जंगले या उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. शहरातील प्रसिद्ध डॉ. राजेश मानवतकर यांच्या पत्नी डॉ. मानवतकर याही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दलित समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते जगन सोनवणे हेही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पत्नी पुष्पा जगन सोनवणे या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात याकडे मतदानाचे लक्ष लागून आहे.









