‘त्या’ जहाजांसाठी भारतीय नौदल उतरणार होर्मुजच्या मैदानात? देशातील घडामोडींचा वेग

---Advertisement---

 

इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होताना दिसत आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेल आणि गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच इराणने होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या मार्गातून मोठ्या प्रमाणावर तेल आणि गॅस वाहतूक होत असल्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. भारतातही एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, काल होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या एका भारतीय जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर भारताने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. सामुद्रधुनीजवळ अडकलेल्या भारतीय जहाजांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यासाठी भारत सरकारकडून नौदल तैनात करण्याचा पर्याय विचाराधीन आहे. या संदर्भात दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरू असून त्यामध्ये परिस्थितीचा सखोल आढावा घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्शियन आखात आणि ओमानच्या परिसरात सुमारे ४० भारतीय जहाजे अडकून पडली आहेत. त्यापैकी काही जहाजे इराणच्या समुद्री हद्दीजवळ थांबून सुरक्षित मार्ग मिळण्याची वाट पाहत आहेत. इराणकडून भारताला आश्वासन देण्यात आले आहे की भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाईल.

या संपूर्ण परिस्थितीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या देखरेखीखाली पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय आढावा सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरक्षा परिस्थिती अधिक बिघडल्यास व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका तैनात करण्याची तयारीही ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला आहे. भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असला तरी एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतील घडामोडींवर भारतासह जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---