तळोदा : धडगाव तालुक्यातील साव-यादिगर येथील उदय नदीवरील पुलाचे काम पंधरा वर्षांपासून रखडलेले आहे. स्थानिक रहिवाशांसाठी स्वांतत्र्याचा सत्त्यात्तर वर्षानंतरही परीस्थिती जैसे थे आहे. शासन प्रशासन कुंभकर्णी झोपेतून कधी जागे होणार? नदी पलीकडे मोटरसायकल नेण्यासाठी आठ ते दहा जण मिळून नदीपात्रातून उचलून न्यावी लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधी किती वर्ष बघ्याची भूमिका घेणार ? असा प्रश्न सर्वसामन्यांमधून उपस्थित केला जात आहे.
उदय नदीवरील पुलाचे रखडलेले काम सुरू व्हावे यासाठी गेल्यावर्षी पन्नास लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. तो निधी त्याच नदीच्या पाण्यात बुडाला कि काय? अशी शंका उपस्थित केली जाते आहे. दरवर्षी, पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. शाळा, कॉलेज, दवाखाना, बाजार, व्यापार, व्यवसाय, लग्न समारंभ, दशक्रिया विधी व उत्तरकार्य याठी ये-जा करण्यासाठी जाण्या येण्याचा प्रश्न उपस्थित होतो.
मोटरसायकलने प्रवास करण्यासाठी, नदी पलीकडे जायला बोटीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, बोट नसली की, मोटर सायकल आठ दहा जण मिळून, उचलून पलीकडे नेतात. ज्या मोटर सायकलवर माणसाला स्वार व्हायचे असते, ती मोटर सायकल आधी माणसांच्या खांद्यावर स्वार होते. अशी भयानक व जीवघेणी कसरत करावी लागते. नुकताच डोंगराळ भागात पुर्व मोसमी पाऊस झाला असून, नदिला पुर आला असून माणसे नदीपात्रात पाण्यातून मोटरसायकल उचलून नदीपार करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, धडगाव तालुक्यातील विकासाची लक्तरे टांगली गेली आहे. शासन-प्रशासन, आणि लोकप्रतिनिधींचा कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करीत आहेत.