---Advertisement---
Yaval Municipal Council work : शहरातील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विरार नगर भागामध्ये गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभमान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम व्हावे यासाठी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विनंती पत्र देऊन निधीची मागणी केली होती. यापूर्वी पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात मंदिर परिसरात भव्य सभामंडप बांधण्यात आले होते व परिसरामध्ये बगीचा निर्मिती करण्यात आलेली आहे.
गजानन महाराज भक्त परिवार व परिसरातील रहिवासी यांनी मंदिरासमोरील चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी अतुल पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने पाटील यांनी हा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून आणला होता. नंतर निविदा प्रक्रिया होऊन कामाची सुरुवात करण्यात आली आहे. हे काम नगरोत्थान योजनेतून मंजूर आहे. कामाची सुरुवात येथील उद्योजक भैयासाहेब चौधरी, निवृत्त प्राचार्य डॉ. एफ. एन. महाजन, सेवानिवृत्त नायब तहसीलदार पी. एम. जोशी, प्रा. अशोक काटकर, प्रा. संजय कदम, मनीष चौधरी, शरद चतुर, महेश सराफ, विजय चौधरी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, अनिल पाठक, अशोक भंडारी, वासुदेव आमोदकर, नीलेश पाटील उपस्थित होते. पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने भाविक व परिसरातील नागरिकांनी अतुल पाटील यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.