---Advertisement---
जळगाव : दहा महिन्यांपूर्वी मोठ्या मुलाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. अशात या धक्क्यातून सावरत असणाऱ्या आई वडिलांवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अर्थात घरातील एकमेव कमावता असलेल्या लहान मुलाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नितीन सुरेश बिरारी (३६) असे मयत विवाहित तरुणाचे नाव आहे. पातोंडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुरेश रामदास पाटील यांचे खवशी रस्त्यालगत नांद्री शिवारात शेतजमीन आहे. त्यांनी खरीप हंगामात मका लागवड केली होती. मागील महिन्यात सततच्या पावसामुळे व कमी बाजारभावामुळे त्यांनी मका पीक कापून शेतात मकाच्या ढीग केला होता.
सुरेश रामदास बिरारी यांचा मुलगा नितीन हा मका काढण्याचे थ्रेशर मशीन व ट्रॅक्टर घेऊन शेतात गेला. मका काढत असताना मक्याचे दाणे शेतात पडत असल्याने तो मका काढण्याच्या मशीनखाली माल काढत होता. यावेळी त्याच्या गळ्यातील लांब रुमाल मका काढण्याच्या थ्रेशर मशीनच्या ब्लोअरमध्ये अडकला व काही कळण्याच्या आतच त्याच्या मानेला जोराचा गळफास लागला.
त्याला उपचारासाठी अमळनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे. नितीनवर घराची जबाबदारी होती. तो घरातील एकमेव कमावता होता.
दहा महिन्यापूर्वी मोठा भावाचा मृत्यू
दहा महिन्यांपूर्वी नितीन बिरारी याच्या मोठा भाऊ योगेश बिरारी याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. त्यालाही दोन मुले आहेत. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी नितीनवर होती. आता नितीनही सोडून गेल्याने दोन्ही भांवांचे कुटुंब उघड्यावर पडले.









