जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रक्रियेला आचारसंहितेचा फटका

जळगाव :  यावर्षी आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा बदल्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. मिनी मंत्रालयातील वर्ग-३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी मे महिन्यात होत असतात. मात्र यंदा लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरू असल्याने बदल्यांची प्रक्रिया काही दिवस लांबणार आहेत. यावर्षी मात्र जून महिन्यात बदत्या होण्याची शक्यता आहे.
जि.प.त प्रशासकीय, विनंती, आपसी बदल्या दरवर्षी केल्या जात असतात. तीन वर्ष एकाच टेबलावर सेवा झालेल्या व एकाच विभागात पाच वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातात. मात्र यंदा १५ मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागत्याने शासनाकडून अद्याप तरी बदल्यांचे वेळापत्रक जिल्हा परिषदांना देण्यात आले नाही. त्यामुळे यंदा बदल्यांची प्रक्रिया रखडणार आहे. मागील वर्षी मे महिन्यात बदली प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात जि.पच्या विविध विभागातील १२१ प्रशासकीय तर २३० विनंती अशा एकूण ३५१ कर्मचारी बदली पात्र ठरले होते. यंदा देखील प्रशासनाकडून बदल्यांसाठीची तयारी सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात आली आहे. त्यात बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या देखील तयार करण्यात आल्या आहे. आचारसंहिता ४ जूनपर्यंत असल्याने त्यानंतर शासनाचे आदेश प्राप्त झाले तर ही प्रक्रिया राबविली जाईल. मात्र त्यानंतरदेखील विधानसभा व जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने यंदा बदल्यांची प्रक्रिया होईल की नाही याबाबत साशंकता आहे.

शिक्षक बदल्यांनाही ‘ब्रेक’
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यादेखील याच काळात होतात. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच बदली झालेले शिक्षक शाळांना सुरूवात होण्यापूर्वी रूजू होत असतात. मात्र या बदल्यांनादेखील आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’ लागला आहे. जि.प.चे कर्मचारी व शिक्षक हे लोकसभा निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत.