जळगाव : जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रीया दरवर्षी चर्चेचा विषय ठरत असते. यावर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी एका टेबलावर पाच वर्ष झालेल्या कर्मचार्यांची उचलबांगडी करीत अन्य विभागात त्यांच्या बदल्या केल्या आहे. मात्र या कर्मचार्यांना दुसर्या विभागात करमेना अशी स्थिती झाली आहे. त्याच पदावर बदलून येण्यासाठी कर्मचार्यांकडून आटापीटा केला जात असून यासाठी कुठल्या ना कुठल्या पध्दतीने दबावतंत्र वापरले जात असल्याची बाब समोर येत आहे. असाच काहीसाप्रकार बांधकाम विभागातून काही कर्मचार्यांची बदली झाली आहे. बांधकाम विभागातून बदली झालेला हा वरिष्ठ सहाय्यक काम एका विभागात करतो तर त्यांचे मन मात्र दुसर्या विभागात असल्याचे दिसून येते. बांधकाम विभागात पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी हा वरिष्ठ सहाय्यक लॉबिग करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू सीईओ पुन्हा त्याचठिकाणी संबंधिताला नियुक्ती देतील, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत नाही.
जिल्हा परिषदेत काही वरिष्ठ सहाय्यक कर्मचार्यांच्या पाच वर्षानंतर एकाच टेबलावरून अन्य विभागात बदल्या काही महिन्यापुर्वीच झाल्या आहे. पदस्थापना ज्या विभागात होईल त्याच विभागाकडून वेतन अदा होईल, असे फर्मान त्यावेळी काढण्यात आल्याने कर्मचारी रूजू झाले. मात्र विभाग बदलल्याने कर्मचार्यांकडून आता पुन्हा त्याच जागेवर जाण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधल्या जात आहे. बर्याच विंभागात असे प्रकार होत असून सर्वाधिक स्पर्धा ही बांधकाम विभागात सुरू आहे. त्यासाठी दबावतंत्राचा देखील वापर होत असल्याची चर्चा आहे.
काम वाटप समितीची बैठक गेल्या काही दिवसापुर्वीच झाली असून ही सर्व कामे बांधकाम विभागाकडून होत असल्याने संबधीत कामांच्या टेबलांसाठी कर्मचार्यांची स्पर्धा होत आहे. आधीच त्या जागेवर रूजू झालेल्या कर्मचार्यांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथुन बदलून गेलेल्या कर्मचार्यांचे नव्या विभागात मन लागत नसल्याची स्थिती आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून देखील अशा कर्मचार्यांच्या फाईली पुन्हा फिरविण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सीईओंनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.