दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव:  येथून किराणा खरेदी करुन दुचाकीने घरी जात असताना  दुचाकीला अपघात होऊन या दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. कबीर भिवा चव्हाण (वय ४४ रा. शिरसोली) असे मृताचे नाव आहे.  शिरसोली गावातील नेहरुनगर परिरसरात ही घटना रविवार १० रोजी दुपारी घडली. मृत तरुण हा जैन व्हॅली कंपनीत कामाला जावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आज कबीर चव्हाण हे दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएम ९१५१ ने जळगाव येथे आले. किराणा व साहित्य घेवून ते शिरसोली घराकडे जात होते. गावातून जात असताना अपघात झाला. डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने ते जागेवर बेशुध्द झाले.

एमआयडीसी पोलिसांनी शिरसोलीकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी तत्काळ जखमीस वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मृत घोषीत केले. ही वार्ता कानावर पडल्यानंतर कुटुंबातील सदस्य शोकात बुडाले. घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मयताच्या पश्चात पत्नी, दोन, मुले, आई तसेच भाऊ असा परिवार आहे. या घटनेने शिरसोलीत हळहळ व्यक्त करण्यात आली.