जळगाव : राज्यात रस्ते अपघातातील वर्षभरात मृतांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू होणाऱ्या राज्यातील पाच जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षभरात साडेपाचशेहून अधिक वाहनधारकांना जीव गमवावा लागला. त्यावर उपाय म्हणून महामार्गावरील अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी पोलीस दलातर्फे मृत्युंजय दूताची फौज उभी करण्यात येत आहे. जीव वाचवणाऱ्या अशा दूतांना १ लाखांपासून ५ लाखांपर्यंतचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी गुरुवार, ३० रोजी येथे दिली.
राज्यातील महामार्गावर १००४ ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघाती केंद्र) आहेत. त्यानुसार या अपघात स्थळांवर उपाययोजना आखल्या जात आहेत. देशातील अपघातांच्या तुलनेत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. ही बाब राज्यासाठी अतिशय गंभीर असल्याची माहिती अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिली.
महामार्ग पोलिसांच्या पाळधी येथील दूरक्षेत्र इमारतीच्या उद्घाटनासाठी ते गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर होते. नाशिकहून येताना त्यांनी एरंडोल येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील रस्ते आणि अपघातांविषयी सविस्तर माहिती दिली.
राज्यात सर्वाधिक अपघात पुण्यात होत आहेत. त्यापाठोपाठ नाशिक, नागपूर, सोलापूर व जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. बहुतांशी अपघातांमागे अतिवेगाने वाहने हाकल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्य कारणांमध्ये तकलादू टायर कारणीभूत ठरल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी अपघातांमध्ये १५ हजार २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १९ हजार ५०० जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मयतांची संख्या पाहता राज्यभरात जनजागृतीची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली.