राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळधार मुसळधार पाऊस, जळगावातील कशी आहेत स्थिती?

जळगाव/पुणे: आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून येत्या ४८ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अरबी समुद्रात मौसमी वारे वाहू लागल्याने मुंबईसह कोकणात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

या जिल्ह्यात जोरदार पाऊस?
मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ५ दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात तुफान पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.