एरंडोल : राज्य शासनाने अकरावी वर्गासाठी केंद्रीय औनलाईन पद्धतीने घेण्याचे ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्याना ऑनलाईन फॉर्म भरतांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यात संबंधित वेबसाईटमध्ये फॉर्म भरला जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची सलग्न उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये केंद्रिय ऑनलाईन प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आपले रजिस्ट्रेशन करून घेण्याचे सांगण्यात आहे.
ऑनलाइन प्रवेश प्रणालीचा मनस्ताप हा ग्रामीण भागात जास्त पाहण्यास मिळत आहे. खेड्यापाड्यावरून लोक शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी येतात. ते आपल्या पाल्यासोबत येऊन. इयत्ता दहावीचे ऑनलाईन प्रिंट आऊट.व त्यासोबत लागणारी अत्यावश्यक कागदपत्रे किंवा झेरॉक्स घेऊन येतात परंतु कॉलेजला आल्यानंतर ऑनलाइन प्रणाली सुरळीत कार्य करत नाही. कधी सर्वर डाऊन असते. तर कधी वेबसाईट दुरुस्तीचे काम चालू असते. तर कधी इंटरनेटच नसते. या असंख्य तांत्रिक अडचणींचा पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यामध्ये त्यांची वेळ तर जातेच परंतु पैसा देखील जातो. वेळ व पैसा जाऊन मानसिक त्रास हा सहन करावा लागतो. ग्रामीण भागातला विद्यार्थी हा ईमेल आयडी कसा काढणार, काही घरांची परिस्थिती एवढी बिकट असते की तो स्वतःचा फोन घेऊ शकत नाही. फोन नसल्यामुळे त्याला ओटीपी कसा येणार. या आणि अशा असंख्य प्रश्नांना पालकांना सामोरे जावे लागते. यावेळी शिक्षकांची तेवढीच दमछाक त्यांना समजवतांना होत असते.यावर पर्याय म्हणून काही महाविद्यालयांनी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू केले आहे.
शासनाने ज्या तालुक्यात किंवा शहरात एकच अनुदानित महाविद्यालय आहे त्या ठिकाणी बहुपर्यायी महाविद्यालय सिलेक्शन चा ऑप्शन घ्यायला नको होता. महाविद्यालय स्तरावर प्रवेशाची मेरिट लिस्ट नुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घ्यायला पाहिजे कारण ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी हा त्याला जे जवळ पडेल तेच कॉलेज तो घेईल. ग्रामीण भागात काही कुटुंबांची परिस्थिती खूपच हालाखीची असल्यामुळे त्याच्यापुढे बाहेर गावाला जाण्यासाठी पुरेसा पैसा देखील नसतो. यावर शासनाने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ते प्रवेशापासून वंचित राहणार नाही व त्यांना आर्थिक जड बसणार नाही अशाच ठिकाणी त्यांचे प्रवेश करून घ्यावेत असे जाणकार लोकांचे मत आहे.