---Advertisement---
जळगाव शहरात एका खाजगी वित्त संस्थेत मोठा आर्थिक गैरप्रकार उघडकीस आला आहे. भारत फायनान्स या खाजगी बँकेत तब्बल 31 लाख 12 हजार 164 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच माजी वसुली अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचे शाखा व्यवस्थापक मनीष देवचंद चौधरी यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. हा सर्व प्रकार 8 डिसेंबर 2022 ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडल्याचे तपासात समोर आले आहे.
बँकेच्या वार्षिक ऑडिट अहवालानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तपासणीदरम्यान असे दिसून आले की, कष्टकरी महिलांना दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी अनेक महिलांकडून हप्त्याची रक्कम गोळा केली. मात्र ही रक्कम बँकेच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 336 महिलांकडून हप्ते वसूल करण्यात आले, परंतु ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली नाही. तपासात काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
त्यामध्ये शेख आबिद शादुल्ला यांनी 215 महिलांकडून सुमारे 7 लाख 16 हजार रुपये, प्रदीप हरिश्चंद्र पवार यांनी 34 महिलांकडून 8 लाख 70 हजार रुपये, तर अश्विन रवींद्र पाटील यांनी 49 महिलांकडून 6 लाख 87 हजार रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. तसेच अक्षय शंकर बारी यांनी 20 महिलांकडून 4 लाख 90 हजार रुपये, आणि सचिन भिवसिंग राठोड यांनी 18 महिलांकडून 3 लाख 47 हजार रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, या पाचही जणांनी मिळून 31 लाख 12 हजार 164 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









