जळगावात रंगणार ४था देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, जाणून घ्या कधीपासून ?

#image_title

जळगाव ।   राज्यस्तरीय चौथ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे पोस्टर अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले. जळगावात होणाऱ्या या प्रतिष्ठित फेस्टिव्हलच्या अनावरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रामलाल चौबे ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह अविनाश नेहते, शहर संघचालक उज्ज्वल चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आणि अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी आदी उपस्थित होते.

जळगावात ८ ते ९ फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे हा फिल्म फेस्टिव्हल होणार आहे. या देवगिरी फिल्म फेस्टिव्हलच्या प्रचार व प्रसारासाठी खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ अशा विविध भागात मोठ्या प्रमाणावर पोस्टर विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, कॅम्पस फिल्म या तीन विभागांसह बालचित्रपट या विषयांवर फिल्म मागविण्यात आल्या आहे. १ लाखांच्यावर रोख पारितोषिक व करंडक असे पुरस्काराचे दिले जाणार आहे.

तसेच दोन दिवसीय चित्रपट महोत्सवात चित्रपटांच्या स्क्रिनिंगसह चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा सहवास तसेच, दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, पटकथाकार, तंत्रज्ञ यांच्या मास्टर क्लास (कार्यशाळा) होणार असून सोबतच चित्रपट दिंडी, प्रदर्शनी, टुरिंग टॉकीज यासारखे अभिनव उपक्रम असणार आहे. १५ जानेवारी २०२५ पर्यंत चित्रपट पाठवावे असे अभिनेता, दिग्दर्शक तथा लेखक प्रा. योगेश सोमण व संयोजन समितीने सांगितले.

शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल हा कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीची एक महत्त्वाची संधी असून, राज्यभरातील कलावंत यामध्ये सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश नव्या प्रतिभांना प्रोत्साहन देणे आणि प्रेक्षकांपर्यंत संदेश पोहोचवणे हा आहे.