जळगाव : कृषी विभागाकडून योजनाविषयी जनजागृती मोहिम राबविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हा अधिकक्ष कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
निवेदनाचा आशय असा की, राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. मात्र, शेतकऱ्यांमध्ये या योजनांबाबत जागृती नसल्याचे आढळून येत आहे. शेतकऱ्यांमध्ये या योजनांची जनजागृती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना चालू आहे आणि कोणत्या बंद आहेत ते कृषी विभागाने जाहिर करावे. पोखरा योजना सुरू करण्यात यावी. पिकविमा ज्या पध्दतीने काढले जातात त्याचपध्दतीने गायी, म्हशी, शेळया व मेंढया यांचाही विमा शासनाकडुन विनामुल्य काढण्यात यावा. कृषीविषयक योजना या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. कोणत्या योजनेसाठी शेतकरी पात्र आहेत हे कृषिविभागाने सांगावे. नवीन कृषीविषयक योजना ज्या आल्या आहेत त्यांचा योग्य प्रचार प्रसार करावा. कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातुन प्रत्येक योजनाबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे या मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर जळगाव तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, तालुका संघटक विलास सोनार, शहर सचिव हर्षल वाणी, संदीप मांडोळे, अर्जुन सोनवणे, तालुका उपाध्यक्ष देवेंद्र माळी, तालुका सचिव मनोज लोहार आदींची स्वाक्षरी आहे.