पाचोरा : पाचोरा-भडगाव तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी-नाल्याना पूर शेती पिकांचे नुकसान तर नगरदेवळा येथे दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे.
पाचोरा -भडगाव तालुक्यात रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने बहुळा धरण सह खडकदेवळा मध्यम प्रकल्प,अग्नावती मध्यम प्रकल्प भरले असून हिवरा नदी सह अग्नावतीला पूर आला नगर देवळा येथील दोन तरुण मध्यरात्री अग्नावतीच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास हे दोन्ही तरुण अग्नावतीचा पूर ओसरल्यावर महादेव मंदिर जवळील फरशीवर मृतावस्थेत आढळून आले.
हे दोन्ही तरुण नगर देवळा येथील असून त्यांची नावे राजेंद्र गोरख पाटील (वय-२८),व माजी सैनिक रवींद्र प्रभाकर पाटील (वय-५०) असे असून पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले असून पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तसेच शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पिंपळगाव (हरेश्वर) ते जरंडी व्हाया घोडसगाव रस्ता पुराच्या पाण्यात मध्यरात्री वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान आमदार किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रांताधिकारी भूषण अहिरे ,तहसीलदार विजय बनसोडे यांची बैठक घेऊन पाचोरा-भडगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.