जळगाव : आज परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानाला कुठलेही निकष न लावता सरळ हाताने शासनाने मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार, १५ रोजी देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला असून शेतकरी अतिशय चिंताग्रस्त झाले आहेत. यात मका ,कपाशी, सोयाबीन या सारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी, मका, ज्वारी यांना पावसामुळे हिरवे कोंब येत आहे. यामुळे ही पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पावसामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. अशा शेतकरी बांधवाला कुठल्याही अटी शर्ती न ठेवता सरळ हाताने मदत करावी. आताची स्थिती पाहता शेतकऱ्याच्या हाताला काही लागणार नाही. काही दिवसांवर दिवाळी हा हिंदूंचा सण असून जर पिकांचे नुकसान झाले आणि उत्पन्न हाताला लागले नाही तर तो सण देखील कसा साजरा करावा हा मोठा प्रश्न शेतकरी बांधवांपुढे उभा राहील. सरकारने येणाऱ्या आठ दिवसांमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सरळ मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, महानगर अध्यक्ष विनोद पाटील, उपमा नगराध्यक्ष आशिष सपकाळे, भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील, पाचोरा शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, अमोल कांबळे, निलेश पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सर संघटक इस्माईल खाटीक, चिटणीस निलेश परदेशी, राजू डोंगरे, उपशहर सचिव खुशाल ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.