जळगाव : देशातील घरा घरात पाणी उपलब्ध व्हावे, हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले होते. या स्वप्नाला मूर्त रूप देण्यासाठी देशात अमृत योजना राबविली जात आहे. याअंतर्गत २०१७ साली जळगाव शहरात या योजनेला प्रारंभ करण्यात आला. ही योजना आज मंगळवार १५ रोजी महापालिकेकडे सुपूर्त करण्यात आली.
याप्रसंगी खासदार स्मिता वाघ मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, माजी महापौर स्मिता भोळे जैन इरिगेशनचे प्रकल्प अभियंता भिरूड ,अन्य सहकारी व मान्यवर उपस्थित होते.
आज मंगळवारी जळगाव शहरातील अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील २५३ कोटीचे कामाचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्यात आले. यात सहा उंच पाण्याच्या टाक्या, दोन पंप हाऊस, ९१० किलोमीटर पाण्याची पाईपलाईन व ८५ हजार घरांना नळ कनेक्शन योजना हस्तांतरित करण्यात आले.
याप्रसंगी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून योजनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार वाघ यांनी सांगितले की, २०१७ साली ‘हर घर जल’ ही योजना सुरु झाली होती. मात्र काही अडचणीमुळे ही योजना आता पूर्ण झालेली आहे. या योजनेअंतर्गत ७०० किलोमीटरवरून ९०० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी प्रत्येक घरात नळ कनेक्शनचे स्वप्न साकार होत आहे. महिलांच्या डोक्यावरील भार हलका करण्यात येऊन हंडा उतरवण्याचे काम घराघरापर्यंत आले आहे. महिलांचे दुःख दूर करण्यात यश आल्याचे व एक महिला म्हणून मला या गोष्टीचा आनंद वाटत असल्याची भावना खासदार स्मिता वाघ यांनी यावेळी व्यक्त केली.