जळगाव : पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी या कारणासाठी १० जणांच्या टोळक्याने शिरसोली गावांत तिघांना शस्त्राने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. ही घटना बुधवार, १६ रोजी सायंकाळी घडली.. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला भगवान राजाराम पाटील (वय ३१ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली येथे अशोक नगरात भगवान पाटील हे कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार दि. १६ रोजी संध्याकाळी ७ वाजता ते शिरसोली येथील डेअरीवर दूध देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना भाचा भूषण पाटील यांचा फोन आला. विशाल भिल व दीपक भिल हे घरी आले असून ते भांडण करीत आहेत. हे ऐकताच भगवान पाटील हे लागलीच घराकडे गेले. घरी पोहचल्यावर त्यांना त्यांचे वडील राजाराम शिवराम पाटील, भाचा भूषण बाळू पाटील, काका अजय जयराम पाटील हे जखमी अवस्थेत दिसले.
भूषण पाटील याने सांगितले की, सायंकाळी साडेसहा वाजता भूषण पाटील आणि फिर्यादीचे वडील राजाराम पाटील हे घराच्या अंगणात बसलेले असताना गावातील विजय भिल, सुखदेव भिल, विशाल भिल, दीपक विठ्ठल भिल, आकाश संजय नागपुरे, नितीन भिल, सुभाष भिल, सचिन भिल, गजानन भिल, अजय भिल हे १० जण घरी आले होते.
त्यांनी शिवीगाळ केली असता याचा जाब विचारला म्हणून त्यांनी मारहाण केली. यात गजानन भिल याने चॉपरने भूषण याच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले. तसेच अजय भिल याने लाकडी दांडक्याने भूषणला मारहाण केली. सचिन भिल याने लोखंडी हातोडीने राजाराम पाटील यांना पाठीवर, पोटावर मारहाण केली. भांडण सोडण्यासाठी आलेले अजय जयराम पाटील यांना सुद्धा मारहाण, शिवीगाळ करून सुभाष भिल याने अजय पाटील यांच्या डोक्यावर कोयता मारून गंभीर जखमी केले.
मारहाण होत असतांना ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थ येत असल्याचे पाहून मारहाण करणारे पळून गेले.ग्रामस्थांनी व फिर्यादीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला वरील १० संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.