भुसावळ : निवडणूक काळात शांततेला बाधा ठरू पाहणाऱ्या उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत पोलीस प्रशासनाने प्रस्ताव सादर केले होते. भुसावळ प्रांताधिकाऱ्यांकडे हद्दपारीची सुनावणी झाल्यानंतर प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी मुक्ताईनगर येथील दोन तर भुसावळातील तीन अशा पाच जणांच्या हद्दपारीचे आदेश काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अन्य संशयितांच्या हद्दपारीवर लवकरच निर्णय
पोलीस प्रशासनाकडून प्रांताधिकऱ्यांकडे उपद्रवी, गुन्हेगार वृत्तीच्या लोकांचे प्रस्ताव पाठविण्यात आले. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने कायद्याचा आधार घेत हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून पाठविले होते. यावर संबंधितांचे म्हणणे ऐकून घेत प्रांताधिकारी पाटील यांनी हद्दपारीचे आदेश शनिवारी काढले. यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. अजूनही प्रांताधिकाऱ्यांकडे हद्दपारीचे प्रस्ताव पडून आहे. त्यावर सुध्दा लवकरच निर्णय होणार अथवा पोलिसांनी त्यांना जिल्ह्यातून बाहेर काढायचे आहे. असे आदेशात नमूद केले आहे. शनिवारी काढण्यात आलेल्या हद्दपारीचे आदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्यांच्याहद्दपारीचे आदेश पारीत झाले आहे. त्यांनी तात्काळ जळगाव जिल्हा सोडून जायचे आहे
यांच्याविरोधात हद्दपारीचे आदेश
मुक्ताईनगर येथील इब्राहीम उर्फ टिपू टिल्या सत्तार मन्यार (३२) यास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. तसेच मुक्ताईनगरातीलच आंबेडकर नगरातील रहिवासी अरविंद विजय बोदडे यालादेखील एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. तसेच भुसावळातील पवन मनोहर चौधरी (३३, रा.श्रीरामनगर, भुसावळ) यासदेखील एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
शहरातील अमरनाथ नगरातील रहिवासी जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (२५) यालादेखील एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील रहिवासी सागर बबन हुसळे (रा.झेडटीसी नगर, फेकरी) याला सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
भुसावळ शहरातील राजू सूर्यवंशीसह पाच जणांची टोळी हद्दपार : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश
भुसावळातील राजू सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या निकटच्या पाण जणांची टोळी जळगाव जिल्ह्यातून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एक वर्षासाठी हद्दपार केली आहे. निवडणूक काळात झालेल्या कारवाईनंतर गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सात जणांविरोधात प्रस्ताव
रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी हे टोळीचे प्रमुख असून त्यांच्या टोळीतील सात जणांविरुद्ध पोलीस प्रशासनाने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. यावर सुनावणी झाल्यानंतर राजू सूर्यवंशीसह पाच जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. राजू सूर्यवंशी यांच्याविरुद्ध भुसावळ शहर, बाजारपेठ पोलीस ठाणे, वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यांच्याविरोधात हद्दपारीची कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी राजू सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी यांना जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार केले असून दीपक भागवत सूर्यवंशी व रोहित सूर्यवंशी यांची नावे वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे