---Advertisement---
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकासह एकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सीईओंनी एस.टी.उर्दू शाळेला वठणीवर आणत विद्यार्थ्यांचे दाखले दिले.
तालुक्यातील नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू माध्यमिक शाळेतील १० वी उत्तीर्ण ८० विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी आवश्यक शाळा सोडल्याचे दाखले मिळत नव्हते. यामुळे विद्यार्थी व पालक अडचणीत सापडले होते. शाळेचे माजी प्रभारी मुख्याध्यापक सातत्याने अडथळा निर्माण करीत असल्याने दाखले देण्यास टाळाटाळ करत होते. या गंभीर परिस्थितीची माहिती सामाजिक संघटनेमार्फत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ गटशिक्षण अधिकारी सरला पाटील, विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण व खलील पठाण यांचे पथक शाळेत दाखल होण्याचे निर्देश दिले.
---Advertisement---
कुलूप तोडत घेतला ताबा
शनिवारी पोलीस संरक्षणात माध्यमिक शिक्षण विभागाचे पथक पुन्हा शाळेत गेले. कार्यालयात कुलूप असल्याने अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून कुलूप तोडण्यात आले आणि गटशिक्षण अधिकारी सरला पाटील यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार एकतर्फी स्वीकारून, विद्यार्थ्यांना उपलब्ध दप्तरी माहितीच्या आधारे दाखले तयार करून वाटप केले. सीईओ मिनल करणवाल यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क सुनिश्चित करण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य बचावले.
पथकास प्रवेश नाकारला
मात्र प्रभारी मुख्याध्यापकाने शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून प्रशासनाच्या पथकास प्रवेश नाकारला. यानंतर करनवाल यांनी स्वतः लक्ष घालून पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधून सहाय्य मागितले. जिल्हा पोलीस प्रशासनानेही त्वरित प्रतिसाद देत, शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत संबंधित प्रभारी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा व शकील शेख मुसा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.