---Advertisement---
जळगाव : आगामी काळात जिल्ह्यात 550 लोकप्रतिनीधींच्या नियुक्त्या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्याचा स्ट्राइक रेट हा 100 टक्के राहिला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. महायुतीसाठी आमचा आग्रह असला तरी सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजे. महायुतीने आम्हाला हलक्यात घेऊ नये असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे खान्देशचे प्रभारी तथा माजी मंत्री अनिल पाटील यांनी गुरूवारी झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे गुरूवारी जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील हॉटेल इन्फीनिटी येथे पक्षाची जिल्हा आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी खा. आनंद परांजपे, युवकांचे प्रमुख सुरज चव्हाण, कल्याण आखाडे, सुनील मगरे, संध्या सोनवणे, जिल्हाध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, तिलोत्तमा पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, मनीष जैन आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
---Advertisement---
आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की, 2 जुलै 2023 ला मी अजितदादांच्या बंगल्यावर असतांना सुनील तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घ्यायची असल्याचे कानात सांगितले. आज 3 जुलै आहे, मी अजून वाटच पाहत आहे असे सांगताच बैठकीत हंशा पिकला. पक्षाने जळगाव जिल्ह्यात आणखी दोन-तीन जागा दिल्या असत्या तर त्या देखिल निवडून आल्या असत्या असा दावा आ. अनिल पाटील यांनी केला. आपल्या ताकदीवर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपल्या पक्षाचा करायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्या अशी अपेक्षा आहे, अन्यथा पक्षाच्या आदेशानुसार स्वबळाचीही आमची तयारी असल्याचे आ. अनिल पाटील यांनी सांगितले. जिल्हा बैठकीचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी केले तर आभार अरविंद चितोडीया यांनी मानले.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आवाज दाखवा – डॉ. सतीश पाटील
महायुतीच्या माध्यमातून आपण सत्तेत आहोत. परंतु जळगाव जिल्ह्यात काही ठरावीकच पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे होत आहेत. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठेतरी आपण डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीचा आवाज निर्माण करा असे आवाहन माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी बैठकीत केले. ते पुढे म्हणाले की, मुंबईत आमचा पक्षप्रवेश झाला. तशी राष्ट्रवादी ही जुनीच आहे. दिलेला शब्द पाळणार नेता कुणी असेल तर तो अजितदादाच आहे. राज्यात सध्या मोठी चढाओढ सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनेकजण प्रवेश करीत आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपल्याला पक्ष संघटना बांधायची आहे. कार्यकर्त्याला पक्षाने ताकद देण्याची गरज आहे. तरच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला होईल. गतवेळी जिल्हा परिषदेत 16 जागा होत्या आता त्या 25 कशा होतील? यासाठी काम करावे लागणार आहे. सतीशअण्णा वैयक्तीक स्वत:साठी काही करीत नाही, जे करतो ते पक्षासाठी प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे कुणाला काय कान भरायचे ते अजितदादा आल्यावर भरा असा टोलाही डॉ. सतीश पाटील यांनी लगावला.
आपणही सत्तेचे भागीदार – गुलाबराव देवकर
बैठकीचे प्रास्ताविक करतांना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आपणही सत्तेचे भागीदार असल्याची जाणीवर अधिकाऱ्यांना करून द्या. अनिल पाटील मंत्री असतांना संघटना जोमात होती. आता देखिल जिल्ह्याला ताकद दिल्यास संघटना अधिक मजबूत होईल, असे गुलाबराव देवकर यांनी सांगितले.
वारकरी पगडी घालून तटकरेंचा सन्मान
जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी जिल्हा बँकेच्यावतीने प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांचा वारकरी संप्रदायाची पगडी घालून, उपरणे देत, बुक्का लावत सन्मान केला. यावेळी संजय पवार यांनी अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत, अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळावे आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रीपद मिळून सत्तेचे सहकारी व्हावेत अशी विठोबा चरणी जाहीर प्रार्थना केली.