---Advertisement---
जळगाव : राज्य शासनाच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. अशा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची फेर वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करून खोट्या प्रमाणपत्रधारक उमेदवारांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय व निमशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. बोगस दिव्यांगत्वामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय झाला आहे. १९ जुलै २०१४ ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बोगस दिव्यांग शोध अभियान राबविण्यात आले. या अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागांमध्ये बोगस प्रमाणपत्राव्दारे नियुक्ती मिळालेल्या काही उमेदवारांची नावे निर्दशनास आली आहेत.
---Advertisement---
त्याचप्रमाणे बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत बदली करून नियुक्ती मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार कार्यालयात किंवा विभागात दिव्यांग प्रमाणपत्राव्दारे नियुक्त झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्राची खातरजमा करून त्याचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
जिल्ह्यातही याबाबत दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून बदली करून नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ज.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक राज्य प्रकल्प संचालक यांना दिले आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील ६ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रबाबत तक्रार करण्यात आल्यामुळे शिक्षकांच्या दिव्य गत्वाचे प्रमाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकांकडून तपासण्यात आले. त्यात त्यांच्या दिव्यंगत्वाचे प्रमाण प्रमाणपत्रात दर्शविल्याप्रमाणे आढळून आले नाही. त्यात तफावत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या ६ शिक्षकांचा दिव्यांगाच्या आधारावरील बदली दावा फेटाळण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी मिनल करनवाल यांनी सांगितले.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळविलेल्या बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षकांची चौकशी व त्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची तपासणी करून बोगस प्रमाणपत्रे आढळलेल्या कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविणाऱ्या आणि बदलीत पात्र ठरलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.