---Advertisement---
वरणगाव : शहरातील गंगाराम कॉलनी व विकास कॉलनी येथील रहिवाशांनी नवीन जलकुंभ मिळावा या मागणीसाठी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत अनोखे आंदोलन केले. हे आंदोलन सुमारे तासभर चालले. यानंतर लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात नव्याने सात ते आठ जलकुंभ उभारण्याचे काम अरिहंत केंद्रशन (पुणे) मार्फत करण्यात आले आहे. मात्र विकास कॉलनी व गंगाराम कॉलनी परिसरात नगरपरिषदेने जलकुंभासाठी निश्चित केलेली जागा न्याय प्रविष्ठ असल्याने त्याठिकाणी जलकुंभाचे बांधकाम झालेच नाही.
---Advertisement---
यामुळे स्थानिक रहिवाशांना पाण्याच्या कृत्रिम समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने माजी ग्रामपंचायत सदस्य शे. सईद शे. भिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्यप्रवेशद्वाराला स्वतःला दोरीने बांधून घेत आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत तासभर आंदोलन करण्यात आले. या तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताटकळत कार्यालयाच्या बाहेर उभे राहावे लागले. यावेळी पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर पवार यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करीत वस्तुस्थिती विशद केली. मात्र , आंदोलक काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
लेखी आश्वासनाने सुटला तिढा…
अंदाजपत्रकानुसार काम करण्यास नाकारत असल्यामुळे लवकरच याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. तूर्त नारीमाळ्यातील जुन्याच जलकुंभातून विकास कॉलनी व गंगाराम कॉलनीत पाणी वितरण करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तर विकास कॉलनीत व गंगाराम कॉलनीमध्ये नवीन जलकुंभाचे बांधकाम लवकर न झाल्यास आंदोलन पुन्हा छेडण्याचा इशारा शे. सईद शे. भिकारी यांच्यासह सहकाऱ्यांनी दिला आहे.