---Advertisement---
पाचोरा : शाळाबाह्य मुलांना जन्मदाखला उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पवार यांच्या प्रमुख उपरस्थितीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले.
सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणानुसार विशेष करून अनुसूचित जाती जमाती,आदिवासी, भटक्या जाती जमातीतील प्रवेशपात्र मुले शाळाबाह्य म्हणून मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. या मुलांच्या बहुतांशी पालकांजवळ जन्मदाखला, मुलांच्या वयाचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. जन्म दाखला नसल्याने त्यांचे आधार कार्ड काढता येत नाही. त्यामुळे त्यांना शाळेत दाखल करून घेताना फार समस्या निर्माण होत आहेत.
---Advertisement---
एस.डी.एम.एस.युडायस प्लस, सरल, शाळा प्रवेश फॉर्म, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, नमुना नं – १ इ. सर्वच ठिकाणी आधार नंबर सक्तीचा असल्याने या विदयार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने त्यांना जन्मदाखला उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, तसे स्पष्ट आदेश आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी शिक्षक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पवार, जिल्हा सरचिटणीस सतीश बोरसे यांनी दिले. यावेळी शाळाबाह्य मुलांना जन्माचे दाखले उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी संघटनेला दिले आहे.