---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परीषद व पंचायत समितीसाठी २४ लाख २ हजार ४०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात नगरपालिका ८ लाख ४६ हजार. नगरपंचायतींसाठी ४४ हजार ८५९, तर १६ नगरपरिषदेसाठी ४६ लाख १५४ मतदारांची संख्या आहे. १ जुलै २०२५ च्या नोंदणीनुसार मतदारांची संख्या याप्रमाणे असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा परीषद व पंचायत समितीसाठीची प्रारूप रचना १४ जुलै रोजी जाहिर करण्यात आली असून २१ जूलैपर्यंत या रचनेबाबत हरकती नोंदविता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात या निवडणुकीत एकूण ३७ लाख ७२ हजार मतदारांची नोंदणी असून त्यात ४४ हजार ७६५ मतदार वाढले आहेत. जिल्ह्यातील ७ तालुक्यातील गटामध्ये फेरबदल करण्यात आला आहे. त्यात चोपडा, रावेर, यावल, मुक्ताईनगर, चाळीसगाव, अमळनेर, जामनेर या ७तालुक्याचा समावेश आहे. तसेच राजकीय पाच बैठका रचनेच्या अनुषंगाने झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
---Advertisement---
विकसित भारत २०४७ या अंतर्गत शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यात महसूलच्या उद्दीष्टांसह, सातबारा ऑनलाईन मोहिम, तुकडा बंदी, १५५ प्रस्तावावर झालेली कार्यवाही याबाबत प्रशासनाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. पीक पाहणी नोंदविण्यासह अॅग्रीस्टॅकमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ईव्हीएम मशीनची होणार तपासणी
जिल्ह्यात २१०० मतदान केंद्रे असणार आहेत. प्रथम एफएलसी कार्यक्रम २२ जुलै रोजी होणार असून त्यात ३ हजार ३३१ कंट्रोल युनिट तर ३ हजार ३२३ बॅलेट युनिट यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात नादुरूस्त ईव्हीएम मशिन परत पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
लोकसंख्येनुसार गटांची रचना
जळगाव जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायती, १८ नगरपालिका, ६८ जिल्हा परिषद गट, १३६ गण, २ नगरपंचायतींच्या निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून लोकसंख्येच्या आधारावर गट, गण यासह प्रभागाची रचना करण्यात आली आहे.
एका गट व गणात १८ ते २२ हजार लोकसंख्या ग्राह्य धरण्यात येऊन त्यानुसार भौगोलिक सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत.