---Advertisement---

उद्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील ३३२ ब्रदर, सिस्टर बेमुदत संपावर

---Advertisement---

जळगाव : सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी ( १९ जुलै ) पासून सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सर्व परिचर्या संवर्गातील स्त्री-पुरुषांनी (सिस्टर, ब्रदर) हे बेमुदत संपावर जाणार आहे. वरिष्ठ पातळीवर कुठलाही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे अखेर संघटनेला हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आहे.

शुक्रवारीदेखील अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचेशी परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा झाली. अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी, संपावर न जाता रुग्णहित लक्षात घेऊन कामावर या असे आवाहन केले. सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने (संलग्नित मुख्यालय लातूर) दि. १५ व १६ जुलै रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे व निदर्शने केली. राज्यव्यापी संप असूनही जळगाव येथे दि. १७ व १८ जुलैला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन व रुग्णहित लक्षात घेत संघटनेने काम काळ्या फिती लावून सुरु ठेवले होते.

---Advertisement---

वरिष्ठ पातळीवर कुठलाही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे अखेर संघटनेला आता बेमुदत बंदचा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने दि. ६ जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यास राज्यभरातून कडाडून विरोध करण्यात आला आणि शासन निर्णय रद्द करण्यात आला.

राज्यात वाढत्या लोकसंख्येनूसार १०० टक्के पद निर्मिती करणे, १०० टक्के पदोन्नतीसाठी संघटना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत असून याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने परिचारिका संवर्गात संताप व्यक्त केला जात आहे. आता ३३२ कर्मचारी हे शनिवारी (१९ जुलै)पासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (शासन मान्य) शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, चे अध्यक्ष रुपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी, खजिनदार अक्षय सपकाळे या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---