---Advertisement---
जळगाव : कार्यालयातीलच सहकारी महिला अधिकाऱ्याचा मानसिक आणि अश्लिल मेसेज करून छळ करणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना ५०० रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर संबंधित महिला अधिकाऱ्याची माफी मागण्याची नामुष्की ओढविली आहे. मात्र केवळ माफिनामा न घेता डॉ. घोलप यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील एका महिला अधिकाऱ्याने मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्याविरूध्द कामाच्या ठिकाणी सतत मानसिक छळ करून अश्लिल मेसेज करीत असल्याची तक्रार आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे १८ जूनला केली होती. त्यानुसार आयुक्तांनी ही तक्रार चौकशीसाठी तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षांकडे पाठविली होती. समितीच्या अध्यक्षांनी याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना नोटीस पाठवून लेखी खुलासा मागविला होता. दरम्यान या सर्व प्रकाराबाबत खुद्द डॉ. विजय घोलप यांनी आता ५०० रूपयांच्या मुद्रांकावर नोटरी करून लेखी माफिनामा संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या नावे दिला आहे. महापालिकेचे अधिकारी महिलांशी अशा पध्दतीने वर्तणूक करीत असतील तर केवळ माफीनामा न घेता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून जोर धरत आहे.
---Advertisement---
डॉ. घोलप यांचा लेखी माफिनामा असा
मी, विजय पंडित घोलप, मुख्य वैद्यकीय अधिकारी, जळगाव महानगरपालिका येथे कार्यरत असून, मी आपल्यावर (तक्रारदार महिला) गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जो अत्यंत लज्जास्पद, अनुचित, निंदनीय आणि कायद्याचे उल्लंघन करण्याच्या हेतूने त्रास दिला आहे, त्यासाठी मी आपली लेखी माफी मागत आहे. माझे हे वर्तन पूर्णपणे अयोग्य, असभ्य, असंवेदनशील आणि कायद्याच्या विरोधात आहे. याची मला पूर्ण जाणीव झाली आहे. माझ्या या घृणास्पद कृतीमुळे आपल्याला मानसिक धक्का, अपमान, भीती, वेदना व सामाजिक प्रतिष्ठेची हानी सहन करावी लागली आहे. याबद्दल मला अत्यंत तीव्र दुःख आहे. मी कबूल करतो की, माझे वर्तन लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिकार आणि निवारण कायदा, २०१३ अंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते. मी माझ्या चुकीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. यापुढे जर माझ्याकडून पुन्हा असा कोणताही गैरप्रकार घडला, तर मी कोणत्याही प्रकारची दया, संधी अथवा न्यायालयीन मदतीची अपेक्षा ठेवणार नाही. संस्थात्मक अथवा कायदेशीर स्वरूपाची जी काही कठोर कारवाई माझ्यावर केली जाईल (यात सेवेतून बडतर्फी आणि फोजदारी गुन्हा दाखल करणे समाविष्ट आहे). ती मी विनातक्रार सहन करेन. मी या माफिनाम्याद्वारे लेखी रूपात स्वतःचा अपराध सिध्द करीत असून त्याचा नोंदवहीत उल्लेख करण्यासाठी मला कोणतीही हरकत नाही. माझ्या या पश्चाताप आणि कबुलीजबाब लक्षात घेऊन मी आपल्याला नम्र विनंती करतो की, आपण माझ्याविरूध्द केलेली तक्रारी परत घ्यावी. मी माझ्या अशा वागणुकीचा तीव्र निषेध करतो आणि भविष्यात स्त्री-सन्मान, सहकाऱ्यांचा आदर, तसेच कायदेशीर आचारसंहिता यांचे कठोर पालन करण्याची जबाबदारी घेतो. आपल्याला दिलेल्या वेदनेबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून क्षमा मागतो, आपला अपराधी.