---Advertisement---
जळगाव : उध्दव ठाकरे यांचे अजून काय संपायचे बाकी राहिले आहे. ज्यावेळी सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हाच ठाकरे ब्रँड संपला असल्याचे प्रत्युत्तर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी उध्दव ठाकरे यांना दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. उध्दव ठाकरे यांनी शिवसेना ही कोणीही संपवू शकत नाही असे विधान केले होते. त्याला गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री महाजन म्हणाले की, २०१९ मध्ये आमच्याबरोबर राहिलात, निवडून आलात. ५५ लोक तुमचे निवडून आले, आमचे १०७निवडून आले. एवढे लोक येऊन सुद्धा भाजपाला सोडून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हाच ठाकरे हा ब्रँड संपला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेसचा विषय वेगळा होता, त्यांचे विचार वेगळे होते, त्यांची आयडॉलॉजी वेगळी होती. उध्दव ठाकरे सत्तेसाठी व खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. एवढे पराभव झाल्यानंतर समजले पाहिजे की, ठाकरे ब्रँड राहिला कुठे ? असा टोलाही त्यांनी लगावला.
---Advertisement---
राज ठाकरेंवरही टीका
हिंदी आणण्याचा प्रयत्न केला तर दुकानच नाही तर शाळाही बंद करण्याचा इशारा देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मंत्री महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महाजन म्हणाले की, निवडणुका आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडल्या जात असल्याचा विषय हा पक्का आहे ३५ वर्षे झाले मी आमदार आहे मी नेहमी बघतो महाराष्ट्रापासून मुंबईला तोडायच आहे, वेगळं करायचं आहे हा विषय कायम असतो. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की, मुंबईला तोडण्याची कुणाच्या बापाच्या बापाची व पणजोबाची पण हिम्मत नाही. हे सांगून देखील लक्षात येत नसेल तर केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व मराठी मतांवर डोळा ठेवून मुद्दाम अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचे महाजन यांनी सांगितले. आपल्या देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात सर्व धर्माचे लोक आहेत. आम्ही तर उद्या दिल्लीत गेलो आणि म्हटलं की फक्त मराठीतच बोला तर चालणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
रक्षा खडसेंना धोका नाही
लोकसभा निवडणुकीत अॅड. उज्वल निकम यांचा थोड्या मतांनी पराभव झाला याचा दुःख आम्हाला सर्वांना होते. अॅड. उज्वल निकम यांना फक्त खासदार म्हणून राज्यसभेवर घेतलं नसेल ते चांगले वकील आहेत त्यांनी खूप चांगले काम केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकते ते अशक्य नाही. अॅड. उज्वल निकम यांना मंत्रिपद मिळाल्यास रक्षा खडसे यांना धोका निर्माण होईल असे वाटत नाही असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.