---Advertisement---
---Advertisement---
नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करून गांजा वाहतूक करणारी चारचाकी व गांजा पकडल्याची घटना २४ रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. २४ च्या मध्यरात्रीपासून दीप अमावस्या असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अमळनेर तालुक्याच्या चारही बाजूला नाकाबंदी केली होती.
पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वालडे, चालक सुनील पाटील, शहरातील बोरी नदीच्या फरशी पुलावर नाकाबंदी करत होते. चोपड्याकडून चारचाकी क्रमांक एमएच १४ एएम ३९५० वेगाने येताना दिसली. पोलिसांनी तपासणीसाठी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चारचाकी चालकाने गाडी पुढे पळवण्याचा प्रयत्न केला.
लागलीच उपनिरीक्षक काकळीज यांनी पुरुषोत्तम वालडे व चालक सुनील पाटील यांना घेऊन त्यांच्या मागे गाडी काढली. पाठलाग करताना त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, संतोष शरद नागरे, मयूर पाटील, चालक रवी पाटील यांना मदतीला बोलावले. मंगरुळपर्यंत त्यांचा जोरात पाठलाग केला.
आरोपींना आपण पोलिसांच्या टप्प्यात आलो आहोत हे समजताच त्यांनी स्व. आबासो अनिल अंबर पाटील शाळेजवळ सिमेंट बाकांच्या फॅक्टरीत गाडी घालून बाजूच्या म्हशीच्या गोठ्यात धडक दिली. गाडी थांबताच त्यांनी जागेवर चप्पल फेकून शेतात पळ काढला. पोलिसांनीदेखील त्यांच्यामागे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अंधारात गायब झाले. पोलिसांनी गाडीतील १३ किलो गांजा व चारचाकी असा मुद्देमाल जप्त केला. पंचनामा करून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.