---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका अनुदानित निवासी आश्रमशाळेत गोवरचे काही रुग्ण आढळून आले असून, सर्व रुग्ण एकाच ठिकाणी मर्यादित आहेत. सदर रुग्णांमध्ये नंदुरबार, धुळे तसेच मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने तात्काळ कार्यवाही केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकासोबत जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) तज्ज्ञही जळगाव येथे दाखल झाले असून, त्यांनी रुग्णालय व आश्रमशाळेची पाहणी केली. सध्या सर्व रुग्ण धोक्याच्या बाहेर आहेत आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अगदी सौम्य लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांनाही रुग्णालयात दाखल करून काळजी घेतली जात आहे.
जळगाव जिल्ह्यात लसीकरणाचा कव्हरेज समाधानकारक असल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अत्यल्प आहे, असे सार्वजनिक आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आश्रमशाळेतील वसतिगृह व रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.