---Advertisement---
---Advertisement---
शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कातील कालबाह्य नोंद कमी करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागीतली. ही लाचेची रक्कम घेत असताना धुळे एसीबीच्या पथकाने महिला तलाठीसह तिघांना ताब्यात घेतले. बुधवारी (३० जुलै) संध्याकाळी चाळीसगाव तहसील कचेरीजवळ ही कारवाई करण्यात आली.
महिला तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम (वय २९, रा. प्लॉट नं.९ हरीओमनगर, चाळीसगाव), रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार (वय ४०.) तसेच दादा बाबू जाधव (वय ४०, दोन्ही रा.लोंजे, ता.चाळीसगाव) अशी संशयिताची नावे आहेत. संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
काय आहे प्रकरण?
चाळीसगाव तालुक्यात मौजे पाथरजे शिवारात तक्रारदार यांची वडिलोपार्जीत शेतजमीन आहे. त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कातील कालबाह्य (जुनी) नोंद कमी करण्यात याव्यात, असा तक्रारदार यांच्या वडिलांनी अर्ज तलाठी मोमीन रहिम यांच्या कार्यालयात दिला असता तलाठी यांनी तक्रारदार यांना रोजगार सेवक वडिलाल पवार यांना भेटण्यास सांगितले. तसेच पैसे दिल्यावर तुमचे काम करुन देते, असे सांगितले होते. या प्रकरणी तक्रारदार यांनी ३ जुलै रोजी तक्रार दिली होती.
या तक्रारीची ३ जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता वाटणीपत्राप्रमाणे खर्च येईल, असे संशयितांनी म्हटले होते. १४ जुलै रोजी तक्रारदार यांनी पुन्हा तलाठी तसेच रोजगार सेवक यांची भेट घेतली असता तलाठी यांनी या कामाबाबत उद्या सांगते तसेच रोजगार सेवक पवारशी बोलते, असे तक्रारदार यांना सांगितले.
१७ जुलै रोजी काम करुन देण्याच्या मोबदल्यात तलाठी यांनी २५ हजार रुपये घेण्याचे सांगितले आहे. असा निरोप तक्रारदार यांना दिला. तेव्हा दादा जाधव यांनी तक्रारदार यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. ३० जुलै रोजी सापळा कारवाईत रोजगार सेवकाने तलाठी यांच्या चाळीसगाव येथील कार्यालयाबाहेर तक्रारदार यांच्याकडून २५ हजाराची लाच स्विकारली असता ताब्यात घेतले.
या प्रकरणी तिघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनात एसीबी धुळे येथील उपअधीक्षक तथा सापळा अधिकारी सचिन साळुंखे यांच्या पथकातील पोनि पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम मुकेश अहिरे, संतोष पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला, मकरंद पाटील, चालक पोलीस कॉन्स्टेबल जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.