जळगाव : शहरातील पद्मालय विश्रांतीगृह महाराष्ट्र परिवहन महामंडळातील सर्व सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक येथे संपन्न झाली. रविवारी (१० ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विलास पाटील हे होते. प्रास्ताविक सुरेश चांगरे यांनी केले. तर गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीत यासंदर्भात बुधवारी (13 ऑगस्ट ) रोजी भुसावळ येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा होणाऱ्या महामेळाव्याचे नियोजन करण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांचा तूटपुंजा पगार तर सर्वांनाच माहित आहे परंतु सेवानिवृत्तीनंतर केवळ तीन हजार रुपयांमध्ये घर संसार चालवावा लागतो. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काची थकबाकीची रक्कम देखील मिळत नाही. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना कोणतेही आर्थिक संरक्षण नसल्यामुळे परावलंबी बनावे लागते. मुलगा चांगल्या नोकरी धंद्याला असला व सून सांभाळून घेणारी असली तरच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा घरात टिकाव लागतो.
---Advertisement---
अन्यथा त्यास मृत्यूची वाट बघावी लागते. हे महा भयानक सत्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पहावयास मिळते. या सर्व संकटातून मार्ग काढण्यासाठी जळगाव विभागातील सर्व सेवा निवृत्ती कर्मचारी संघर्षासाठी रणांगणात उतरण्यास तयार असल्याचे प्रतिपादन आर के पाटील यांनी केले.
सन 2016 ते 2020 चा करार, करारातील एक टक्के नुसार प्रलंबित घरभाडे भत्ता, एप्रिल 2020 पासून 6500 रुपयांचा फरक, थकीत महागाई भत्ता, ग्रॅज्युटी व महागाई भत्त्याचा फरक असा एकंदरीत सर्वच हिशोब केला तर प्रति कर्मचाऱ्याला काही लाखांपर्यंत रक्कम मिळू शकते. परंतु प्रशासकीय व राजकीय उदासीनतेमुळे सेवानिवृत्त कर्मचारी देशोधडीला लागला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी फॅमिली पासचा निर्णय लागला पण त्या पासवर केवळ साध्या गाडीतच प्रवास करता येतो, आणि शिवशाही आणि इतर बजेस खाली असताना देखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यात प्रवेश मिळत नाही यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असावी असा प्रश्न अभय सहजे यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात 13 ऑगस्ट 2025 रोजी भुसावळ येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महामेळावा होणार आहे. या मेळाव्यात एसटी महामंडळाकडे थकबाकी मिळवण्यासाठी विनामूल्य फॉर्म वाटप करण्यात येणार असून संकलन केंद्रामार्फत फॉर्म जमा करण्यात येणार आहेत. महामेळाव्यास आलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भोजन व्यवस्था करण्यात आलेली असून सेवानिवृत्त बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश चांगरे यांनी केले आहे या उच्चस्तरीय बैठकीत सुनील बडगुजर, सुनील पाटील, गुलाब शेख, पांडूदादा महाजन, आर. आर. सपकाळे, अरुण साळुंखे, राकेश वाघ यांनी सहभाग घेतला.