---Advertisement---
पाळधी ता. धरणगाव : येथे मध्यरात्रीचा सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने नाल्याला पूर आला होता. या पुराचे पाणी नाल्यावर व जवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या दुकानात शिरल्याने १५ दुकानदारांचे तब्बल १ कोटीच्या आसपास नुकसान झाले आहे.
पाळधी येथे मध्यरात्रीचा सुमारास मुसळधार पावसास सुरुवात झाली. या वेळी नागरीक झोपेत होते. पावसाने अचानक रौद्र रुप धारण केले. त्यामुळे तब्बल तास दिड तासाच्या पावसाने नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी मारवाडी गल्लीपर्यंत आले होते. यावेळी काही दुकानदारांना नागरिकांनी फोन लावल्याने त्यांनी धाव घेतली. मात्र, पावसाचा रुद्रावतार व नाल्यावर माणूस बुडेल इतका पूर आल्याने कोणीही दुकानात जाण्याची हिंमत केली नाही. मात्र पाऊस व पूर कमी झाल्यानंतर त्यांनी दुकानांची पाहणी केली.
सकाळी नागरिकांनीही पुराचे पाणी ओसरल्याने एकच गर्दी केली होती. यात स्वामी समर्थ किराणाचे गोपाल सोमाणी यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे दुकानात असलेल्या साखरेच्या पोत्याचे पाकात रूपांतर झाले तर तेथे असलेल्या दाळ व इतर किराणा सामानाचे नुकसान झाले. याच प्रमाणे पूनमचंद सोमाणी, बालाजी किराणा, शिव अग्रो यासह इतर दुकानांचे नुकसान झाले. चेतन झवर व गिरीश झवर यांचा मोबाईल दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे ही नुकसान झाले आहे. याच प्रमाणे राज इलेट्रिकल, अतुल पाटील यांचे सायबर कॅफे ही दुकाने नाल्यापासून सहा फुटावर असल्याने दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.
पुराची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांनी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी ही पाहणी केली. ग्रामविस्तार अधिकारी दिपक पाठक, तलाठी विनोद धाडसे यांनी पाहणी करून पंचनामे केले. यात तलाठी धाडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार या पुरात १५ दुकानदारांचे मिळून तब्बल १ कोटींचे नुकसान झाले आहे.
नाल्यावर असलेल्या खालील दुकानदारांची शटर बंद असल्याने पुराचे पाणी वाढले. याची जाग येऊन ग्रामपंचायतीने सकाळीच या सर्व दुकानांचे शटर कापून टाकले हे आधी केले असते तर इतर दुकानदारांचे नुकसान झाले नसते असे नागरिकांमध्ये चर्चा होती. तर नेहमीच पाणी शिरत असल्याने ग्रामपंचायतीने यावर कायमची उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.
मागेही असेच पंचनामे झाले होते मात्र त्याची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नाही त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने आता तरी ती मिळावी अशी मागणी होत आहे. नाल्यातील रस्त्यावर सर्व दूर चिखल झाल्याने रस्त्यावरील रहदारी थांबली होती याची दखल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घेऊन जैन इरिगेशनचे पाण्याचे टँकर बोलाऊन रस्ता स्वच्छ केल्यावर तेथील वाहतूक सुरळीत सुरू झाली.