---Advertisement---
जळगाव : महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना सहकारी महिला डॉक्टराकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या गंभीर आरोपांमुळे रविवारी (२१ सप्टेंबर) अटक करण्यात आली आहे. शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यानंतर महापालिका तसेच वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सहकारी ३८ वर्षीय महिला डॉक्टरने डॉ. घोलप यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, शाहू महाराज रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात डॉ. विजय घोलप यांनी अश्लील इशारे करत, मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. तसेच त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंधांची मागणी करत विनयभंग केला. या प्रकरणी डॉ. घोलप यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या पीडित डॉक्टर महिलेने ही घटना महानगरपालिकेच्या शाहू महाराज हॉस्पिटल येथे प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉ. विजय घोलप यांना अटक करण्यात आली आहे.
डॉक्टर महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाल्याने महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याविषयी तीन दिवसात त्यांना उत्तर मागण्यात आले होते. प्रत्यक्षात, सोमवारी महापालिकेने थेट निलंबनाचे आदेश काढून डॉ. विजय घोलप यांना मोठा दणका दिला. याशिवाय, महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातही डॉ. घोलप यांच्या पराक्रमामुळे नुकताच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
या विभागात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त असलेल्या एका महिलेच्या जागी प्रत्यक्षात तिचा पती कर्तव्य बजावत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकाराची चौकशी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असताना तीन सदस्यीय चौकशी समितीने त्यासंदर्भातील अहवाल महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे सादर केला. तक्रारीचा प्राथमिक अहवाल विशाखा समितीने आयुक्तांना दिल्यानंतर दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत आयुक्त ढेरे यांनी डॉ. विजय घोलप यांना दोषी ठरवून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश काढले होते.