---Advertisement---
रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरली आणि अफवेने समांतर असलेल्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वे रुळावर प्रवासी उतरले आणि त्या रुळावर विरुद्ध दिशेने आलेल्या रेल्वेने दिलेल्या धडकेने भीषण अपघात घडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना मध्ये प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात घडली आहे, निव्वळ आग लागल्याच्या अफवेने घाबरलेल्या प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस मुरैना जिल्ह्यातील हेतमपूर स्थानकाजवळ असताना अचानक ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेन थांबताच बाहेर पडण्यास सुरुवात केली. अनेक जण रेल्वे रुळांवर उतरले आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, त्याचवेळी शेजारील ट्रॅकवरून पाताळकोट एक्सप्रेस वेगाने येत होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येण्यापूर्वीच काही प्रवासी तिच्या धडकेत सापडले. हा अपघात इतका अचानक घडला की अनेकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या किंकाळ्या आणि नातेवाईकांचा आक्रोश यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
या घटनेनंतर उत्तर मध्य रेल्वेने निवेदन जारी केले आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, एका प्रवाशाने अलार्म चेन ओढल्यामुळे खजुराहो-उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस थांबली होती. त्यानंतर काही प्रवासी खाली उतरून जवळच्या रुळांवर गेले आणि त्याचवेळी पाताळकोट एक्सप्रेसची धडक बसली.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये आफरीन (३५), आशद (४), शकुंतला (६०) आणि वीरमा देवी (५८) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये एका कुटुंबातील सदस्यांचाही समावेश असल्याने या घटनेने अधिकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका महिला प्रवाशाने सांगितले की, अचानक कोणीतरी ट्रेनची साखळी ओढली आणि ‘आग लागली, आग लागली’ अशी आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे घाबरून अनेक प्रवासी खाली उतरले आणि काही क्षणांतच हा भीषण अपघात घडला. रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली असून अफवा कशी पसरली आणि अपघाताची नेमकी कारणे काय होती, याचा शोध घेतला जात आहे.









