---Advertisement---
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगाले हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, तिचा मृतदेह मुंबईजवळील नालासोपारा येथील राहत्या घरी आढळून आला आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रासह तिच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संचिता उगाले ही नालासोपारा पूर्व येथील आचोळे गाव परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या कुटुंबात आई-वडील आणि धाकटी बहीण आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यावेळी ती घरात एकटीच असल्याचे सांगितले जात आहे.
कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस विविध अंगांनी तपास करत असून, अधिकृत तपास अहवाल आल्यानंतरच संपूर्ण घटनेचे सत्य समोर येणार आहे. नागरिकांनी आणि माध्यमांनी अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









