---Advertisement---
मुंबई : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवार, 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात मुंबई शहरातील बँक कर्मचारी सकाळी 11 वाजता आझाद मैदानात एकत्र येऊन सरकार व बँक प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करणार आहेत.
ही माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापुरकर यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2010 साली बँक कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा ही मागणी तत्त्वतः मान्य करण्यात आली होती. मात्र त्यावेळी दोन शनिवार अर्ध्या दिवसांची सुट्टी रद्द करून, उर्वरित दोन शनिवार पूर्ण सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतरही आजपर्यंत बँक कर्मचाऱ्यांची पाच दिवसांचा आठवडा ही मागणी पूर्णपणे अमलात आली नाही. त्यामुळेच आता बँक कर्मचाऱ्यांनी 11 व्या देशव्यापी संपाची हाक दिली असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे मंगळवारी देशभरातील बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.









