बाफना ज्वेलर्समधील सोन्याची चैन चोरी प्रकरणी आंतरराज्यीय आरोपी जेरबंद; चोरीच्या सोन्याची ‘लगड’ हस्तगत

---Advertisement---

 

जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या प्रतिष्ठित ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’ येथे ग्राहकाच्या बहाण्याने येऊन सोन्याची चैन चोरणाऱ्या सराईत आंतरराज्यीय आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे अटकेपासून वाचण्यासाठी आरोपीने चोरीचे सोने वितळवून त्याची सोन्याची ‘लगड’ (Gold Ingot) तयार केली होती, तीदेखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.

सदर घटना दि. ९ जानेवारी २०२६ रोजी घडली होती. एक अज्ञात इसम सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आला. सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्याने १९.३५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (अंदाजे किंमत २ लाख ४९ हजार ६१५ रुपये) चोरून नेली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (a) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा घेतला शोध :

जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासात संशयित आरोपी हा तेलंगणा राज्यातील सायबराबाद परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन भास्कर किसन बानोथ (वय २२, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.

चोरीचे सोने वितळवून ‘लगड’ बनवल्याची चोरट्याची कबुली :

आरोपीची सखोल चौकशी केली असता, ओळख पटू नये आणि चोरीचा माल खपवता यावा यासाठी त्याने चोरलेली सोन्याची साखळी वितळवून सोन्याची लगड बनवल्याची कबुली दिली. पोलिसांनी सदर लगड हस्तगत केली असून गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पुढील तपास सुरू :

आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी शनिपेठ पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले व पोलीस हवालदार बोरसे करीत आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच या पथकात सहभागी श्री. राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, LCB) पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण भालेराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, चापोकों महेश सोमवंशी याचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---