---Advertisement---
हिंदू धर्म जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात आज भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. “राम राम, जय श्री राम” आणि “जयतु जयतु हिंदू राष्ट्र” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार, रोहिंग्यांची वाढती संख्या तसेच लव्ह जिहादसारख्या गंभीर विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी उद्या जळगावात हिंदू धर्म जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वसंध्येला हिंदू जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रचार आणि समाजप्रबोधनाच्या उद्देशाने ही दुचाकी रॅली काढण्यात आली.
ही भव्य रॅली जळगावातील खानदेश सेंट्रल मॉल येथून सुरू झाली. जळगाव शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पिंप्राळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील मानराज पार्क मैदानावर हिंदू धर्म जागृती सभा पार पडणार असून, वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामूहिक वंदे मातरम गीत गायन होणार आहे. या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









