---Advertisement---
मुंबई : इथे राहून ५०० वर्षे सत्ता गाजविणारे सुल्तान, बादशहा आणि २०० वर्षे राज्य करणारे इंग्रज या देशाचे तुकडे करू शकले नसताना आता देशविरोधी शक्ती काय करू शकणार? असा प्रश्न करीत देशाच्या विभाजनाची भीती न बाळगता २०४७ पर्यंत अखंड भारताचा संकल्प मजबूत करावा, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काढले.
संघाच्या स्थापनेच्या १०० वर्षांनिमित्त मुंबईत आयोजित ‘नवे क्षितिज’ या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. उपस्थितांकडून मांडण्यात आलेल्या एकूण १४३ प्रश्नांचे १४ स्वतंत्र श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. संघनीती, हिंदुत्व, राष्ट्रीय परिदृष्य, शिक्षण, अर्थकारण, राजकारण, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा, संस्कृती, कला, क्रीडा व भाषा तसेच जीवनशैली, पर्यावरण आदी विविध विषयांवरील प्रश्नांना सरसंघचालकांनी सुस्पष्ट आणि समर्पक उत्तरे दिली.
डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात समाज, राष्ट्रीय एकात्मता. आरक्षण, लोकसंख्या संतुलन, भ्रष्टाचार, तंत्रज्ञान, शेती आणि अर्थव्यवस्था या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
हिंदू आणि शीख संबंधांवर बोलताना त्यांनी दोन्ही समाजांमध्ये रक्तसंबंध तसेच रोटी-बेटीचे नाते असल्याचे सांगितले. श्री गुरू ग्रंथसाहिबमध्ये देशातील संतांची वाणी असल्याने हिंदू-शीख वेगळे असल्याचा विचार चुकीचा असून, आपण सर्व एकच आहोत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना त्यांनी संविधानानुसार असलेल्या सर्व आरक्षणांना संघाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. जातीय भेदभाव पूर्णपणे नष्ट व्हायला हवा, असे सांगत, ज्यांनी हजारो वर्षे विषमता सहन केली, त्यांच्यासाठी काही काळ सहन करणे हा स्वस्त सौदा असल्याचे मत व्यक्त केले.
बांगलादेशातील हिंदूंनी संघटित व्हावे
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर भाष्य करताना सरसंघचालकांनी तेथील सव्वाकोटी हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन केले. हिंदू समाज संघटित झाल्यास अत्याचारांना आपोआपच आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवक व संघकार्य
संघ स्वयंसेवकांचे सरासरी वय २८ वर्षे आहे. युवक देशप्रेमी असून, त्यांना तर्कशुद्ध पद्धतीने समजावल्यास ते विचार स्वीकारतात. प्रयोगाची संधी देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे सरसंघचालकांनी नमूद केले.
संघाचा सरसंघचालक हिंदूच होणार
संघाचा सरसंघचालक कोणत्याही जातीचा असू शकतो. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य किंवा शूद्र नव्हे, तर हिंदू हाच संघाचा सरसंघचालक असेल. भविष्यात अनुसूचित जाती-जमातीतील स्वयंसेवकही सरसंघचालक होऊ शकतात, असे मोहनजी भागवत यांनी स्पष्ट केले.









