---Advertisement---
मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. मात्र आता शरद पवार गटाने या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. “दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाली होती. पक्षातील काहीजण याबाबत बोलत आहेत; मात्र आता आम्ही हा विषय पूर्णपणे बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणासाठी मागे लागलो आहोत, असे चित्र निर्माण केले जात आहे; ते चुकीचे आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “दादांच्या निधनानंतरच या चर्चा सुरू झाल्या. आम्ही फक्त सत्य आणि शपथपूर्वक भूमिका मांडली. त्यानंतर आम्ही या विषयावर पुन्हा भाष्य केलेले नाही. दादांची इच्छा होती, ती पूर्ण करायची — एवढेच आम्ही सांगितले; मात्र आता यावर न बोलण्याचा निर्णय घेतला आहे.”
विलीनीकरणाला विरोध कोण करत आहे? प्रफुल्ल पटेल आणि सुनील ठाकरे यांचा विरोध आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता शिंदे म्हणाले, “त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आम्ही आता पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहोत. इतरांची भूमिका सांगणे योग्य नाही.”
एनडीएबाबत काय भूमिका?
विलीनीकरणानंतर पक्षाची दिशा काय असती? National Democratic Alliance (एनडीए) सोबत जाणार होतात की अजित पवार एनडीएतून बाहेर पडले असते? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पुढील निर्णय ठरवायचा होता. त्यांच्या मनात काय होते किंवा आमच्या मनात काय होते, हे आता सांगणे योग्य नाही. पुढे एनडीएसोबत जायचे की नाही, हा निर्णय त्यांचाच असेल. सुमित्रा वहिनींचा तो अधिकार आहे.”
या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील विलीनीकरणाच्या चर्चांना आळा बसल्याचे दिसून येत आहे. शरद पवार गट आता स्वतंत्रपणे पक्ष उभारणीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडींचा पुढील परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









