---Advertisement---
मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ मंगळवारी भारत दौऱ्यावर आले असूसन, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी टाटा-एअरबसच्या एच-१२५ हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे आभासी स्वरूपात उद्घाटन केले. या ऐतिहासिक भेटीत दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी स्तरावर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यावेळी २१ विविध करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यात हॅमर क्षेपणास्त्राचाही समावेश आहे.
मुंबईच्या लोकभवनात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, फ्रान्स हा भारताचा सर्वांत जुना आणि विश्वासार्ह धोरणात्मक भागीदार आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांच्यासोबत आम्ही या भागीदारीला अभूतपूर्व ऊर्जा दिली आहे. संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, अंतराळ, एआय, जैवतंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत केले जाईल.
भारत आणि फ्रान्स मिळून अशा हेलिकॉप्टरची निर्मिती करतील, जे माऊंट एव्हरेस्टासारख्या अतिउंच शिखरापर्यंत भरारी घेऊ शकेल. नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सला भारताचा विशेष भागीदार संबोधले. मॅक्राँ यांनी सांगितले की, सबमरीन, एच-१२५ हेलिकॉप्टर आणि एरोनॉटिक्स क्षेत्रात भारत-फ्रान्स सहकार्य अधिक दृढ होईल. तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि संयुक्त उत्पादनावर आमचा भर असेल.
दहशतवादाविरोधात ठाम भूमिका
दोन्ही नेत्यांनी २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मोदी यांनी स्पष्ट केले की, युक्रेन असो, पश्चिम आशिया असो किंवा भारत-प्रशांत आम्ही शांततेच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. दहशतवादाचे उच्चाटन ही आमची सामायिक वचनबद्धता आहे.
व्यापार आणि नव्या युगाची सुरुवात
युरोपियन युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराचे स्वागत करत मॅक्राँ म्हणाले, भारत आणि युरोपमधील करारामुळे द्विपक्षीय व्यापाराला नवी चालना मिळेल. मोदी यांनी २०२६ हे वर्ष भारत-युरोप संबंधांसाठी टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचे सांगितले. भारत-फ्रान्स इनोव्हेशन वर्षाच्या निमित्ताने उद्योग, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
सामरिक भागीदारीला नवी दिशा
फ्रान्स हा भारताचा युरोपमधील प्रमुख धोरणात्मक भागीदार मानला जातो. संरक्षण, अंतराळ, हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांची भागीदारी सातत्याने वाढत आहे. मॅक्राँ यांच्या या दौऱ्यामुळे भारत-फ्रान्स संबंधांना नवे बळ मिळाले असून, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या करारांमुळे भारताची जागतिक ताकद आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
स्वातंत्र्यवीरांची आठवण
इमॅन्युएल मॅक्राँ यांचे मुंबईत स्वागत करताना मला आनंद होत आहे. त्यांनी एआय समिटसाठी मला फ्रान्समध्ये बोलवले होते. फ्रान्सचे सर्वात मोठे पोर्ट ज्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उडी घेतली, त्या समुद्राजवळील हे शहर आहे. मला त्यांना अभिवादन करण्याचे सौभाग्य गतवर्षी मिळाले होते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण करून दिली.









