---Advertisement---
लहान भावाच्या मुलीचे लग्न असल्याने अनेक दिवसांपासून घरात तयारी सुरू होती. सर्वत्र उत्साहाचे वातावरण, पाहुण्यांची लगबग आणि लग्नघरातील आनंद ओसंडून वाहत होता. पुतणीचे लग्न थाटामाटात पार पाडावे यासाठी मोठे बाबा स्वतः सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होते. मात्र, या आनंदाच्या क्षणीच काळाने घाला घातला आणि लग्नघरावर दुःखाचा डोंगर कोसळला.
वरणगाव शहरातील काळबांडे वाड्यातील ही घटना १ मे रोजी घडली. ज्ञानेश्वर प्रभाकर गव्हाणकर यांच्या ज्येष्ठ सुकन्येचा विवाह याच दिवशी निश्चित झाला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये लगीनघाई सुरू होती. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० एप्रिल रोजी सायंकाळी नवरीला हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री डीजेच्या तालावर नाचगाणी झाली आणि घरात आनंदाचे वातावरण शिगेला पोहोचले होते.
हेही वाचा, शेतकऱ्यांनो सावधान! जळगाव जिल्ह्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज….!
दिवसभराच्या धावपळीमुळे थकलेले मोठे बाबा सदाशिव प्रभाकर गव्हाणकर, वय ५२, हे दुसऱ्या दिवशी लवकर उठून लग्नाची तयारी करावी म्हणून लवकर झोपले होते. मात्र, सकाळी घरातील सर्वजण उठून लग्नाच्या तयारीला लागले असताना ते उठलेच नाहीत. त्यांना उठवण्यासाठी अनेकदा हाका मारल्या, पण खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी जवळ जाऊन पाहिले असता ते प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले आणि त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.
ही बातमी समजताच लग्नघरातील आनंद क्षणात विरून गेला. ज्या व्यक्तीने पुतणीचे कन्यादान करून तिचा संसार सुखाचा व्हावा अशी स्वप्ने पाहिली होती, त्याच मोठ्या बाबांनी लग्नाच्या दिवशीच या जगाचा निरोप घेतल्याने सर्वजण सुन्न झाले. घरात एकच आक्रोश पसरला आणि वातावरण पूर्णपणे शोकमय झाले.
लग्नाचा मुहूर्त ठरलेला असल्याने आणि सर्व तयारी पूर्ण झालेली असल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने, मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न करण्यात आला. आनंदाऐवजी दुःखाच्या छायेत हा लग्न सोहळा पार पडला. यानंतर संध्याकाळी सुमारे सात वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात सदाशिव गव्हाणकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण वरणगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









